Tuesday, October 22, 2019


By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, June 18, 2019

सांस्कृतिक मागोवा : कलाकारांना मानधन देणे तर दूरच; पण उलट सादरीकरणासाठी त्यांच्याकडूनच पैसे घेण्याची उलटी गंगा जोरदार वाहत आहे.
- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : कला कोणतीही असली तरी तिला एका उपासनेचा, आराधनेचा दर्जा भारतीय संस्कृतीमध्ये दिला गेलेला आहे. त्यामुळे कलाकारांचा सन्मान आणि त्यांच्या कलेचा आदर करण्याची आपली संस्कृती. जेव्हा कलाकारांना सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाते, तेव्हा त्याला मानधन, बिदागी देऊन त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या कलेचा तो एकप्रकारे सत्कार सोहळाच असतो; पण सध्या मात्र कलेच्या क्षेत्रातही बाजारीकरण सुरू झाले असून, कलाकारांना मानधन देणे तर दूरच; पण उलट सादरीकरणासाठी त्यांच्याकडूनच पैसे घेण्याची उलटी गंगा जोरदार वाहत आहे.

असे प्रकार प्रामुख्याने नवकलाकारांच्या बाबतीत होताना दिसत असून, कला क्षेत्रातील लोकच कलेचा व्यापार करत आहेत. कलेचे आणि विशेषत: नृत्यकलेचे आवश्यक तेवढे शिक्षण घेतले की, कलाकारांना सादरीकरण करून त्यांची कला विविध लोकांपर्यंत पोहोचविण्याची तीव्र इच्छा असते. कारण कलेच्या सादरीकरणातूनच कलाकाराचे नाव होऊन ओळख, प्रसिद्धी मिळते; पण बहुतेकदा नवकलाकारांना चटकन व्यासपीठ उपलब्ध होत नाही. दर्जेदार कार्यक्रमांमध्ये सादरीकरणाची संधी मिळावी म्हणून अनेकांना तर वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते.

सगळ्याच गोष्टी ‘इन्स्टंट’ मिळण्याची सवय झालेल्या आजच्या तरुणांना चटकन ‘नेम अ‍ॅण्ड फेम’ मिळविण्याची घाई झालेली आहे आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा कला क्षेत्रातील काही लोक घेऊ पाहत आहेत. ‘अरंगेतरम’ असो किंवा अगदी ‘वेस्टर्न’ नृत्य शिकविण्याचा भाग असो. कलाकारांना मोठा आर्थिक भुर्दंड बसताना दिसतो. शिवाय आपली कला सादर करावयाची झाल्यास हजारो रुपयांचा खर्चही नवकलाकारांना करावा लागत आहे. नृत्यसंस्कृतीच्या नावाखाली नवकलाकारांना लुटणाऱ्या संस्था शहरात आहेत. नवकलाकारांकडून पैसे घेतात आणि त्यांना अगदी थोड्या वेळासाठी सादरीकरणाची संधी देतात. यातून देशभरातच खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल सुरू झाली असून एक प्रकारे कला क्षेत्रात व्यवसायच सुरू झालेला आहे.

नृत्य क्षेत्रात होणारे हे बाजारीकरण रोखण्यासाठी आणि कला क्षेत्रातील या अनैतिक गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी देशभरातील विविध ठिकाणच्या नृत्य उपासकांनी पुढाकार घेतला असून ‘नृत्य पल्लव’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमादरम्यान गुणवंत नवकलाकारांना पूर्ण सन्मान देऊन आणि त्यांच्या कलेचा आदर ठेवून सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, भुवनेश्वर, चेन्नई याठिकाणी आतापर्यंत असे कार्यक्रम झाले असून, दि. १६ जून रोजी औरंगाबाद शहरातही महागामी गुरुकुलच्या संचालिका तथा नृत्यांगना पार्वती दत्ता यांच्या पुढाकाराने संस्थेच्या शारंगदेव सभागृहात हा उपक्रम राबविण्यात आला. यादरम्यान परिधी जोशी यांनी ओडिसी, तर संगीता राजीव यांनी मोहिनीअट्टम नृत्यप्रकारांचे दमदार सादरीकरण करून कलाप्रेमींची दाद मिळविली.

याविषयी सांगताना पार्वती दत्ता म्हणाल्या की, हा एक प्रकारे सांस्कृतिक क्षेत्रातील भ्रष्टाचारच आहे. यामध्ये नवकलाकारांचे आर्थिक स्वरूपात शोषण होत आहे आणि याच गोष्टीला विरोध म्हणून ‘नृत्य पल्लव’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कलाप्रेमींनी आणि नवकलाकारांनी या बाबतीत चोखंदळ व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

a sojourner....

ASEAN-India October 2022

  30 years of ASEAN-India ties celebrated at Udaipur The 9-day camp included artists from ASEAN countries Indonesia, Philippines, Malaysia, ...