Tuesday, October 22, 2019

जागतिक नृत्य दिवस : थोडे स्मरण- भरपूर विस्मरण

उरूस, सा.विवेक, 16 मे 2018

एक अगदी 70 वर्षांची ज्येष्ठ भरत नाट्यम् नृत्यांगना डॉ. जयश्री राजगोपालन षोडशीच्या उत्साहात हजारो वर्षांपूर्वीच्या लेण्यांमधील शिल्पांतून नृत्य मुद्रा कशा प्रकट झाल्या आहेत हे सांगताना सहजच तशा मुद्रा करून दाखवते. पंच्याहत्तरीचे विख्यात सिने दिग्दर्शक पद्मविभुषण अदूर गोपालकृष्णन नृत्यांवरच्या आपल्या माहितीपटाची माहिती देताना आपल्या लहानपणीच्या कला संस्कारांत रमून जातात. नृत्यासाठी प्रकाश योजना कशी आणि किती महत्त्वाची आहे याचे पैलू उलगडून दाखवताना आपले गुरू गौतम भट्टाचार्य यांचे स्मरण करताना संदीप दत्त गहिवरून जातात. कला पत्रकार सुहानी सिंग यांना छोट्या विद्यार्थीनीने प्रश्‍न विचारताच आपण आई उमा डोग्रा यांच्या कडून प्रत्यक्ष कथ्थक शिकलो हे सांगताना त्यांच्या शब्दांत कलेबाबतचा अभिमान झळकत राहतो. कला समिक्षक कुणाल रॉय हे सजगपणे नृत्याच्या पैलूंवर चर्चा करताना माध्यमांनी केलेला अन्याय मांडतात आणि ऐकणार्‍यांच्या काळजाला घरे पडतात. हे सगळे घडवून आणणार्‍या ओडिसी कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता इंग्रजी हिंदी भाषेचे पूल साधत आपल्या शिष्यांना कला रसिकांना अभिरूचीच्या वेगळ्याच पातळीवर घेवून जात असतात.
ही दृष्ये आहेत 29 एप्रिल या जागतिक नृत्य दिना निमित्त औरंगाबाद येथे महागामी गुरूकुलात झालेल्या चार दिवसीय कार्यक्रमांमधली. 29 एप्रिल हा दिवस जगभरात नृत्य दिवस म्हणून 1982 पासून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे महान कलाकार जीन जॉर्जेस नोव्हेरे याच्या आठवणीत हा दिवस साजरा केला जातो.

आपल्याकडे तर नृत्याची परंपरा अगदी शिवाच्या तांडव नृत्यापासून सांगितली जाते. शिवाय जागतिक नृत्य दिवस जो 29 एप्रिल आहे त्या काळाशीही भारतीय संदर्भ जूळून येतो. हा काळ जवळपास वसंत ऋतूचा काळ आहे. आपल्याकडे तसेही वसंत उत्सव साजरा करण्याची परंपरा आहेही.

औरंगाबादेत 21,22,28 व 29 एप्रिल असे चार दिवस हा जागतिक नृत्य दिवस साजरा झाला. केवळ नृत्याचे सादरीकरण इतक्यापुरता हा महोत्सव असला असता तर त्याची फारशी दखल घेण्याचे काही कारण नव्हते. पण या निमित्ताने नृत्याच्या विविध पैलूंवर त्या त्या क्षेत्रातील विद्वान बोलावून चर्चा घडवून आणल्या गेली हे विशेष.

ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना जयश्री रामगोपालन यांनी जून्या लेण्यांमधील शिल्पांतून ज्या नृत्य मुद्रा प्रकट होतात त्यांचे सप्रयोग स्पष्टीकरण सोप्या भाषेत मांडले. यातून आपल्या नृत्य परंपरेचे भक्कम पुरावेच समोर आले. अगदी आधुनिक काळात शंकराचार्यांनी 1980 मध्ये महाराष्ट्रात सातार्‍याला मंदिर निर्माण करून त्यावर नृत्य मुद्रा कसे आवर्जून कोरून घेतल्या ही माहिती त्यांनी दिली तेंव्हा प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. कारण हे मंदिर महाराष्ट्रात असून केवळ धार्मिक कर्मकांड करणार्‍या शंकराचार्यांकडून अशी कलाविषयक उत्तम कृती व्हावी हे जरा अनपेक्षीत होतं. पुढे अदूर गोपालकृष्णन यांच्याही विवेचनात नृत्य कलेच्या संगोपनात मंदिरांचा अतिशय मोलाचा वाटा असल्याचे स्पष्ट झाले.

जागतिक किर्तीचे प्रकाश योजनाकार संदीप दत्त यांचे अनुभव विस्मयचकित करणारे होते. आधुनिक काळात प्रकाश योजनेचा वापर करून नृत्याच्या हावभावांना कसा उठाव देता येतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले. आदल्याच दिवशी अष्टप्रहर हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम या महोत्सवात सादर झाला होता. या कार्यक्रमास संदीप दत्त यांची प्रकाश योजना लाभली होती. पहाटेच्या रागांसाठी आल्लाददायक उजळ प्रकाश योजना, दुपारच्या रागांसाठी तीव्र प्रकाश, संध्याकाळच्या रागांसाठी काळोखाची छाया दर्शविणारी हुरहुर लावणारी, रात्रीच्या पहिल्या प्रहराची फिकी निळसर छटा असलेली, उशीराच्या प्रहराची गदड निळ्या रंगाची अशा कितीतरी छटा त्यांनी दाखवल्या होत्या. प्रकाश योजनेत एलईडी दिव्यांचा प्रकाश कसा नृत्याला हानीकारक आहे हे बारकावे त्यांनी सप्रमाण दाखवले.

सुहानी सिंग या कला पत्रकार म्हणून परिचित आहेत. त्यांनी नृत्यविषयक कार्यक्रमांचे वार्तांकन करताना येणार्‍या अडचणी आणि आव्हाने यांची सविस्तर चर्चा केली. केवळ पारंपरिक नृत्यच नव्हे तर आधुनिक प्रकारच्या नृत्यांचीही एक पत्रकार म्हणून कशी दखल घ्यावी लागते हेही त्यांनी विषद केले. ज्येष्ठ कलाकारांशी वागताना किती काळजी घ्यावी लागते. त्यांच्याकडून माहिती काढून घेताना स्वत:चे असलेले या विषयातील ज्ञान कसे उपयोगी पडते हेही त्यांनी सांगितले.

पद्मविभुषण अदूर गोपालकृष्णन यांचे दोन माहितीपट या महोत्सवात दाखविले गेले. महान कथकली कलाकार कलामंडलम गोपी यांच्यावरचा माहितीपट अतिशय महत्त्वाचा आहे. कथकली कलाकारांना चेहर्‍याची रंगरंगोटी (मेक अप) करण्यासाठी अक्षरश: चार चार तास लागतात. त्यांची पूर्व तयारीच कित्येक तास चालते. गोपी यांच्यावरील हा माहितीपट करण्यासाठी अदूरजींनी अतिशय मेहनत घेतली. इतकेच नाही तर या कलेचे पावित्र्य चित्रिकरण काळातही जपले जाईल याकडे कटाक्ष ठेवला. एक कलाकार एकदा मद्यपान करून आलेला लक्षात आल्यावर त्यांनी त्या संपूर्ण दिवसाचे चित्रिकरण स्थगित ठेवले. त्या कलाकाराला आपली चुक कळल्यावर परत कुणी तसे वागले नाही.

दुसरा माहितीपट मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारावर बेतलेला आहे. माहिनीअट्टमच्या चार मान्यवर गुरू आणि त्यांच्या शिष्या असा हा माहितीपट आहे. हे नृत्य मंदिरात जसे सादर केले जाते तसेच चित्रिकरण अदूरजींनी केले आहे. विशेष म्हणजे हे माहितीपट मल्याळम भाषेतच आहेत. आपल्याकडे मातृभाषेत काही करायचे म्हणजे आपण दुय्यम दर्जाचे समजतो. पण अदूरजींसारखी माणसे आपल्या मातृभाषेत आपल्या संस्कृतीत आपल्या कलाप्रकारांतूनच आपली कलाकृती निर्माण करतात आणि त्याला जागतिक मान्यता मिळवून देतात. हे मराठी माणसांनी लक्षात घेण्यासारखे आहे.

अरूण खोपकर यांनी भरत नाट्यम नृत्यांगना लीला सॅमसंन यांच्यावर केलेला माहितीपट तसेच कुमार सोहनी यांचा सुप्रसिद्ध ओडिसी नर्तक गुरू पद्मविभुषण केलुचरण महापात्रा यांच्यावरील माहितीपटही या महोत्सवात दाखविण्यात आले.
चर्चा-माहितीपट या सोबतच नृत्य सादरीकरणाचे दोन सुंदर प्रयोग महागामी गुरूकुलाने रसिकांसमोर ठेवले. अष्टटप्रहर या नावाने कथ्थकचे सुंदर सादरीकरण पार्वती दत्ता आणि त्यांच्या शिष्यांनी केले. तसेच ओडिसी नृत्याचेही उत्कल क्रांती नावाने सादरीकरण झाले. ओडिसी नृत्याच्या सादरीकरणात ओडिशाच्या पारंपरिक मर्दलम म्हणजेच पखावज (मृदंग) सोबत सादर होणारा नृत्य प्रकार सादर झाला. ओडिसी नृत्यात पल्लवी हा नृत्यप्रकार म्हणजे शुद्ध कला समजली जाते. त्याचे सादरीकरण करताना तरूण नृत्यांगना त्यातील भाव समजून नृत्य करत होते हे विशेष. अन्यथा नृत्य म्हणजे केवळ यांत्रिक कवायत ठरू शकते. त्यातून रसिकांना आनंद मिळणे शक्य नाही.

पार्वती दत्ता यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मराठी संतांच्या रचनांचाही अंतर्भाव या सादरीकरणात केला. ज्ञानेश्वरांची रचना ‘चंद्र तेथे चंद्रिका । शंभु तेथे अंबिका । संत तेथे विवेका। असणे की जे’ ओडिसी नर्तनात प्रत्यक्ष समोर येणे ही एक वेगळीच अनुभूती होती. चांगली कला नेहमीच प्रदेशाचे भाषेचे काळाचे बंधन ओलांडून पुढे जाते हे खरे आहे.

चार दिवस जी चर्चा मोठ्या विद्वानांकडून रसिकांनी ऐकली त्याचा अनुभव कथ्थक व ओडिसी नृत्याच्या सादरीकरणातून रसिकांना घेता आला.

जागतिक नृत्य दिवसा निमित्त जागजागी असे कार्यक्रम व्हायला हवेत. पण तसे फारसे घडलेले दिसत नाही. माध्यमांनीही अशा कार्यक्रमांना पुरेशी प्रसिद्धी दिलेली दिसत नाही. बहुतांश सामान्य रसिक नृत्य साक्षर नसल्याने त्यांना आपल्याकडच्या नृत्य प्रकारांकडे खेचून आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.

केवळ शास्त्रीयच नव्हे तर लोकनृत्यांचीही मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्यांचेही जतन होणे गरजेचे आहे. जागतिक नृत्य दिवसाच्या निमित्ताने हा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. शालेय पातळीवर आता स्नेहसंमेलने मोठ्या थाटात उत्साहात बर्‍यापैकी खर्च करून साजरी केली जातात. त्यासाठी बाहेरून मोठी बिदागी देवून कोरिओग्राफर नृत्य शिक्षक बोलावले जातात. यापेक्षा शालेय अथवा महाविद्यालयीन पातळीवर नियमित स्वरूपात नृत्याचे शिक्षण दिले जावे. जेणे करून विद्यार्थ्यांची कलाविषयक जाणिव प्रगल्भ होत जाईल.

No comments:

Post a Comment

a sojourner....

ASEAN-India October 2022

  30 years of ASEAN-India ties celebrated at Udaipur The 9-day camp included artists from ASEAN countries Indonesia, Philippines, Malaysia, ...