Wednesday, September 7, 2022

Tribute to Pandit Birju Maharaj | स्मरण:अद्वितीय कलावंत...असामान्य माणूस!

 

Tribute to Pandit Birju Maharaj

स्मरण:अद्वितीय कलावंत...असामान्य माणूस!


भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच कथ्थक नृत्याला अांतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळवून देणारे पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे नुकतेच निधन झाले. औरंगाबादच्या महागामी गुरुकुलच्या संचालिका, कथ्थक आणि ओडिसी नृत्यगुरु पार्वती दत्ता यांनी त्यांच्याकडे केवळ नृत्याचे शिक्षणच घेतले नाही, तर त्यांच्यासोबत देश-विदेशातील अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्य सादरीकरणाची संधीही त्यांना मिळाली. पंडितजींच्या आठवणींना त्यांनी दिलेला हा उजाळा...

पंडित बिरजू महाराज यांना साऱ्या कलाविश्वाने ‘नृत्यसम्राट’ अशी उपाधी दिली. कलेप्रति त्यांच्या असलेल्या दृष्टीला सर्वांनी नेहमीच वंदन केले. बिरजू महाराज नृत्यातील युगपुरुष होते. कथ्थक नृत्यात त्यांनी एक प्रकारची क्रांती आणली. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला होता. तो राजाश्रयाचा काळ होता. त्या वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्य सादरीकरणाचा एक साचा त्यांनी बनवला होता. परंपरेला धक्का न लावता त्यांनी कथ्थकला नावीन्याची जोड दिली, त्यात अनोखे प्रयोग केले. नृत्याचीदेखील एक भाषा असते. कथ्थकचीही एक भाषा आहे. या भाषेत त्यांनी नवेपणा आणला. जागतिक स्तरावर बिरजू महाराज एक ‘रोल मॉडेल’ होते. पन्नास वर्षांपूर्वीच त्यांनी ‘नृत्यसम्राट’ म्हणून जगभरात ओळख मिळवली होती. नृत्यातील नवोन्मेषासाठी चिंतन केले, नवीन रचना केल्या. त्यामुळेच बिरजू महाराजांना युवावस्थेतच मोठमोठे पुरस्कार आणि सन्मानही मिळाले. फक्त कथ्थकच नव्हे, तर त्यांनी अन्य नृत्य प्रकारांनाही प्रेरणा दिली. एक कलावंत म्हणून ज्या पद्धतीने अन्य कलांना सन्मान देण्याचे मोठेपण त्यांनी जपले ते केवळ असामान्य आहे. त्यांच्या कलेबरोबरच माणूसपणानेदेखील अनेकांना प्रभावित केले.

ज्यांचे वय आज ७० ते ७५ च्या घरात असेल, असे अन्य नृत्यशैलीचे गुरूही पंडितजींना आपला आदर्श मानून त्यांच्या नृत्यातील बारकावे, शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. नृत्य शिकवणाऱ्या चार ते पाच पिढ्यांनी पंडितजींना आपला आदर्श मानले. महागामी गुरुकुलमध्ये नृत्यकारांच्या तीन पिढ्या तयार झाल्या आहेत. गेल्या २५ वर्षांपासून मी महागामी गुरुकुलची सेवा करते आहे.

माझ्यानंतरच्या तीन पिढ्याही बिरजू महाराजांना आदर्श आणि गुरूंच्या रूपात पाहतात. सर्वांवर त्यांचा व्यापक प्रभाव राहिला आहे. फक्त कथ्थकच नव्हे, तर अनेक कलांमध्ये महाराज प्रवीण होते. उत्कृष्ट गायक होते, कविता लिहीत, अनेक गीतांना संगीतही त्यांनी दिले आहे. तबला, पखवाज, ढोलकी, बासरी, सरोद, व्हायोलिन अशी दहा प्रकारची वाद्ये ते वाजवत. अनेक भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्याकडे मी दिल्लीत शिकत होते. त्या वेळी बऱ्याचदा तालीम आणि शिकवून झाले की ते कधी बंगाली, मराठी, गुजराती गाणी गात. रवींद्र संगीत त्यांना विशेष आवडायचे. त्यांनी परंपरेद्वारे नवनवीन विचारांचे निरूपण नृत्याच्या माध्यमातून केले. एक रचना त्यांनी वर्तमानपत्रांवरही केली होती. या विषयावर नृत्य होऊ शकते असा कोणी विचार तरी केला असेल का? एक महान व्यक्तीच असा विचार करू शकते. भारताने १९८२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. त्या वेळी सरकारने पंडितजींना नृत्याच्या माध्यमातून खेळांविषयीची भावरचना सादर करावी असे सुचवले. त्या वेळी त्यांनी “नृत्य केली’ या सुंदर रचनेच्या माध्यमातून खेळाची गोष्ट कथ्थकच्या माध्यमातून सादर केली होती. प्रत्येक घटना, मानवी भावना मग तो आनंद असो वा दु:ख.. त्याला बिरजू महाराजांनी नृत्यरचनेतून साद घातली. जीवन त्यांच्यासाठी एक कला आणि दर्पण होते. त्यांनी प्रत्येक क्षण कलेसाठी समर्पित केला. अनेकदा त्यांचे सादरीकरण इतके उत्स्फूर्त असायचे की एखाद्या क्षणी आपण कुठला आविष्कार कशा पद्धतीने सादर केला याचे त्यांनादेखील आश्चर्य वाटे. त्यामुळेच अल्लारखां खाँ, झाकीर हुसेन, पंडित किशन महाराज हे सगळे त्यांना खूप मानायचे. मी त्यांच्या छायेत शिकले, त्यांच्यासोबत नृत्य यात्रा करू शकले, ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. मी तीन वर्षांची असताना पंडितजींचा स्टेज परफॉर्मन्स पाहिला होता. थोडे मोठे झाल्यावर त्यांच्याकडेच नृत्य शिकायचे हा माझा ध्यास बनला आणि पुढे मी दिल्लीत जाऊन त्यांच्याकडे नृत्य शिकलेही. त्यांचा आशीर्वाद, स्नेह आणि प्रेरणा लाभली. १९९६ मध्ये मी औरंगाबादला आले. इथे महागामी गुरुकुलची स्थापना झाली. त्यानिमित्ताने एक वर्षाच्या आत महाराजजींना आमंत्रित केले. पहिला सार्वजनिक कार्यक्रम औरंगाबादमध्ये ३ डिसेंबर १९९७ रोजी झाला. इथे महागामीत ते एक आठवडा राहिले. त्यानंतरही अनेक वेळा आले. महागामी गुरुकुलमध्ये आज विस्तारलेला वटवृक्ष त्यांच्याच हातून लावलेला आहे. शारंगदेव सदनाचे भूमिपूजनही त्यांनी केले होते. साधना गुरुकुल शिबिरालाही त्यांनी भेट दिली होती. मुलांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही दिले. २०१२ मध्ये महागामीच्या वतीने पंडितजींना शारंगदेव सन्मान देऊन गौरवण्यात आले.

डिसेंबरमध्ये त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. ते औरंगाबादला येणार होते. त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली होती. अशा खूप आठवणी त्यांच्याविषयीच्या आहेत. महागामीच्या सर्व शिष्यांना त्यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाली. आज डान्स क्लासच्या नावाखाली लोक पैसा कमावतात. कलेबाबत खूप मतप्रवाह आहेत. अशी स्थिती असताना एक वटवृक्ष कलेप्रति कसा समर्पित होता हे महाराजजींच्या साधनेकडे पाहून जाणवते. इंग्लंड, चीन, स्पेन येथे तसेच विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांत त्यांच्यासोबत नृत्य सादरीकरणाची संधी मला मिळाली. माझ्या शिष्यांसोबतही मी केलेल्या सादरीकरणालाही पंडितजींनी प्रोत्साहन दिले. मी खूप शास्त्रशुद्ध शिकवते म्हणून त्यांना नेहमीच माझ्या कामाचे कौतुक होते. माझ्या शिष्यांसोबत मी कोरियाचा एक दौरा केला होता. केंद्र सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) अंतर्गत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांत देशातील उत्कृष्ट कलाकार सहभागी होतात. त्यात मला माझ्या विद्यार्थ्यांसह निमंत्रित केले गेले. बर्लिनमधील फेस्टिव्हल ऑफ इंडियासाठी ही त्यांच्यासोबत मलाही निमंत्रित करण्यात आले होते. पंडितजींसोबत नृत्य सादर करू शकले. माझ्या शिष्यांनाही ती संधी देऊ शकले. कलेप्रति समर्पित अशा एका श्रेष्ठ साधकाच्या, ‘नृत्यसम्राटा’च्या पावलांसोबत पावले टाकता आली, त्यांचे आशीर्वाद आणि प्रोत्साहन लाभले हे आमचे भाग्य आहे.

शब्दांकन : विद्या गावंडे



No comments:

Post a Comment

a sojourner....

ASEAN-India October 2022

  30 years of ASEAN-India ties celebrated at Udaipur The 9-day camp included artists from ASEAN countries Indonesia, Philippines, Malaysia, ...